काय बोलू कळतच नाही आहे
माझ्या blog वरची पहिली entry जी माझी नाहीं आहे......
खरं तर अक्कांना जरा तरी पाठ टेकायला मिळावी असं वाटत होतं. पण आजच्या दिवशी ते जमणार नाही, हेही त्यांना माहीत होतं. नाना कुठे दिसताहेत का हे बघण्यासाठी त्यांनी सभोवार नजर टाकली. नाना कोचाच्या पाठीवर मान टाकून डोळे मिटून बसले होते. अक्कांना हसू आलं. नानांनाही पाठ टेकण्याची इच्छा झाली असणार हे त्यांच्याकडे बघताक्षणी कळत होतं. तसं आजच्या काळात चौऱ्याहत्तर वर्ष म्हणजे काही फार वय नव्हे, पण तरुणही नाही ना! गेल्या आठ दिवसांपासून पाहुण्यांची वर्दळ आणि आज सकाळपासूनची दगदग. त्यामुळे थकायला होणं स्वाभाविक होतं.
अक्का आणि नानांना स्वतः करायचं काहीच नव्हतं कारण आजच्या समारंभाचे ते दोघे उत्सवमूर्ती होते. आज त्यांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस होता. तो मोठ्या प्रमाणात साजरा करायचा हे लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवशीच ठरलं होतं. लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवशी कुणी वाकून नमस्कार करताना तर कुणी आशीर्वाद देताना प्रत्येकाने हीच इच्छा प्रकट केली होती. ""आता पन्नासावा वाढदिवस असाच थाटामाटात साजरा होऊ दे.'' अक्कांना ती संध्याकाळ जशीच्या तशी आठवत होती. त्या दिवसानंतरच तर त्यांचं आयुष्य बदलून गेलं होतं. सगळे पाहुणे घरोघरी गेल्यानंतर आणि मुलं आपापल्या खोल्यांत झोपायला गेल्यानंतर अक्का एकट्याच बागेतील झोपाळ्यावर बसल्या होत्या. झोपाळा मंद हलत होता.
कोणीतरी हलवल्यासारखं वाटल्यामुळे अक्कांनी डोळे उघडले. वेदिता त्यांच्या हाताला धरून हलवत होती.
"हे ग काय आजी, झोपतेस कसली? आपण सगळ्यांनी पार्टी गेम्स खेळायचं ठरलंय ना? ओ आबा, खेळायचं म्हणता आणि झोपता काय होऽऽ!'' अंकुरने धोशा लावला होता.
"हो, हो! किती गडबड करतो आहेस? बाकी मंडळी कुठे आहेत? ती येऊ देत ना! त्यांना बोलव आधी.''
सगळी वानरसेना ""काकाऽ, मामाऽ आईय्ऽऽ'' करत पळाली. स्वतःशीच हसत अक्का उठल्या. नाना जागे होऊन त्यांच्याकडेच बघत होते. अक्कांनी त्यांना घड्याळाकडे बोट दाखवून गोळी घेण्याची आठवण केली; आणि त्या नानांसाठी पाणी आणायला स्वयंपाकघराकडे जायला वळल्या. ""शारदा, घेतली मी गोळी मघाशीच. तुझा डोळा लागला होता तेव्हा. बस इकडे. येतीलच मुलं एवढ्यात.'' अक्का नानांच्या शेजारीच कोचावर बसल्या.
"काय श्रीधर, अगदी जोड्याने बसला आहात. परत प्रेझेंट मिळणार नाही रे बाबा.'' आत येणाऱ्या नारायणकाकांनी टोकलं. नारायणकाकांची बायको दोन वर्षांपूर्वी वारली होती, पण काका आपल्या मुला-सुनेसह खास जबलपूरहून आले होते. त्यांचा नातू पंधरा दिवसांपूर्वीच एम एस करण्यासाठी यूएसला गेला होता.
"काय भावोजी तुम्ही पण, आता असली चेष्टा करायचं वय आहे का आमचं?''
"अग वहिनी, अजून कुठे वय झालंय तुमचं? आताशी कुठे पन्नाशी झाली आहे. आता लग्नाची पंच्याहत्तरी आणि श्रीधरची शंभरी एकदमच करू या.'' गडगडाट करून हसत नारायणकाकांनी चिडवलं.
तोपर्यंत बाकीची मंडळी येऊन जागा पकडून बसलीच होती. कार्यक्रमाचा ताबा बच्चेकंपनीने घेतला होता. त्यांची कार्यक्रमापूर्वीची लगबग सुरू झाली. असल्या कामात वेदिता पुढे. तेवढ्या वेळात तिने मेकअप करून "कलाकार' मंडळी तयार केली होती.
"हाय एवरी बऽडीऽऽ! आय ऍम वेदिता अँड....''
"ए, मराठी, मराठी! हा काय तुमच्या शाळेचा कार्यक्रम आहे का?''
"ए काय ग शैलूआत्तू, डिस्टर्ब करू नको ना!''
"ओ के बाबा, करा सुरू.''
अशा त्या सवाल जबाबाच्या गोंधळातच कार्यक्रम सुरू झाला. स्वरचित स्वागत गीत, रेकॉर्ड डान्स, जोक्स, असा सगळा कार्यक्रम झाला आणि मोठ्या मंडळींनी हुश्श! म्हणून निःश्वास टाकेपर्यंत ओंकारने ताबा घेतला.
"हॅल्लोऽ, आता मी होस्ट आहे या इवेन्टचा. या इवेन्टचं नाव आहे डम्ब शेराज.''
"काय रे हे खेळ तुमचे. आम्हाला समजेल असे खेळ काढा रे.'' नाना कळवळून म्हणाले.
"आबा, सोप्प आहे हो. मैं हूँ ना! जोड्या जोड्या करायच्या. मी एकाच्या कानात पिक्चरचं नाव सांगेन. त्याने ऍक्टिंग करायची. दुसऱ्याने नाव ओळखायचं. बोलायचं नाहीऽ, ओठ पण हलवायचे नाहीत. जी जोडी सगळ्यात जास्त बरोबर उत्तरं देईल ती जोडी विनर. ओ के?''
"ओ के तर ओ के रे बाबा.'' गोंधळलेल्या आबांनी हताश स्वरात म्हटलं आणि सगळे हसले. पुन्हा एकदा जोड्या ठरवताना तोच गदारोळ. छोट्या कोमलला झोपावायला शकुनकाकी गेल्यामुळे आणि "मला कोणीच इंपॉर्टन्स देत नाही. स्टुपिड!' असं ओंकारला फटकारून वेदिता फणफणत आत निघून गेल्याने एक जोडी आपोआपच कमी झाली. अक्का-नानांची जोडी प्रथम खेळ नवा असल्यामुळे जराशी गडबडली पण खेळ एकदा नीट कळल्यानंतर त्यांनी सगळ्यांपुढे बाजी मारली. अर्थात त्यांच्यासाठी मुलांनी जुन्या सिनेमाची नावं आपल्या आई-वडिलांना विचारून लिहिली होती. त्यामुळे अक्का-नानाही खूष होते.
नारायणआबांनी केलेल्या "मांडवली'मुळे वेदिताने आबा-आजींना, ओंकारला "खुन्नस' देत बक्षीस दिलं.
"हे हो काय आबा, सगळं कसं ओळखलं तुम्ही आजीच्या मनातलं? जाऊ दे बाबा!'' या संहिताच्या लाडिक उद्गारानंतर नानांनी अक्कांना चक्क डोळा मारला आणि अक्काही त्यावर झकास लाजल्याने एकच खसखस पिकली.
"आता माझं सरप्राइज!'' नानांनी घोषणा केली. आता कसलं सरप्राइज, वाढदिवसानिमित्तचा परतआहेर तर सकाळीच झाला आहे, असा भाव सगळ्यांच्या चेहऱ्यावर असतानाच नानांनी अक्कांकडे पाहिलं. अक्कांनी शोभनाला खूण केली आणि शोभना चटकन स्वयंपाकघरातून एक भलामोठा तीन मजली केक घेऊन आली. "वॉव्', "सही', "क्यूऽऽट' "किती गोड' अशा उद्गारातच नानांनी खिशातून 25 च्या आकाराची मेणबत्ती काढली आणि अलगद केकवर ठेवली.
"आबा, अहो 50 पाहिजे. 25 कसं लावलंत?'
"काय नाना, मला सांगायचं ना, मी दिली असती आणून.''
"गडबडीत बघितलं नाही का नाना?''
सगळ्या बाजूंनी प्रश्न आदळत होते, पण नाना अविचल. सगळ्यांना खुणेने थांबवून नाना म्हणाले,
"गडबड नाही की फसगत नाही. मी योग्य आकड्याचीच मेणबत्ती लावतोय. नारायण म्हणेल, की तू काय एकचा आकडाही लावशील. पण काय सांगतो ते ऐका आणि मग ठरवा बरोबर की चूक ते.''
"आमच्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस कसा विसरेन मी? तुमची पिल्लं नाही, पण तुम्ही मोठे तर हजर होताच की सगळे! तोही दिवस छान मजेत गेला आणि तुम्ही सगळे झोपायला गेलात. मीही झोपण्यासाठी खोलीकडे वळत होतो, तर बागेतला झोपाळा हलताना दिसला. त्यामुळे कोण आहे की काय ते बघण्यासाठी मी पुढे झालो. झोपाळ्यावर बसून शारदा हलकेच झोका घेत होती. आश्चर्य वाटून मी पुढे झालो. आपल्याच तंद्रीत शारदा झोपाळा झुलवत होती. मी जवळ आल्याची चाहूलही तिला लागली नाही.''
अक्कांनाही तो दिवस चांगलाच स्मरणात होता. नानांची जवळून आलेली हाक ऐकून त्या एकदम दचकल्या. झोका थांबवून त्यांनी नानांकडे पाहिलं. अक्कांचा विवर्ण चेहरा पाहून नाना चरकले. चटकन झोपाळा थांबवत त्यांनी अक्कांना विचारलं,
"काही होतंय का तुला शारदा? दमली आहेस दिवसभर. झोप येत नसेल तर एखादी रेस्ट्रिल घेतेस?''
"नको. तुम्ही जा झोपायला. मी बसते थोडा वेळ. बरी आहे मी श्री.''
अक्कांच्या तोंडून "श्री' ही हाक ऐकून नानांना आश्चर्य वाटलं. नव्या नव्हाळीच्या दिवसात किती विनवण्या केल्यानंतर एकांतात एखाद्या उत्कट क्षणी अशी हाक अक्कांच्या तोंडून निघायची. आज अचानक ती हाक ऐकून नाना थबकले.
"झोप येत नाही का? मी बसू का थोडा वेळ?''
"खरंच बसता?''
झोपाळ्याच्या कडेला टेकता टेकता नाना अक्कांना बोलतं करण्यासाठी म्हणाले.
"झकास झाला नाही कार्यक्रम आजचा?'' अक्कांनी नुसतं स्मित केलं.
"बोलवलेले सगळे लोकही आले. सगळं छान झालं होतं. स्वयंपाक वगैरे. मंडळींनी तुझ्या हातच्या बटाट्याच्या रश्शावर आणि मसालेभातावर ताव मारला.'' यावरही अक्कांचं स्मितहास्य बघून नाना नाही म्हटलं तरी जरा वैतागलेच.
"खूष नाही आहेस का तू शारदा? प्रॉब्लेम काय आहे?''
"श्री, तुम्ही म्हणाल सुख दुखतंय म्हणून. तसा प्रॉब्लेम काहीच नाही. पण तुम्ही तरी खरेच खूष आहात का?''
"अर्थात, मी खूष आहे बुवा, का तू नाहीस खूष?''
"तुम्हाला बरं वाटावं म्हणून म्हणते मी "हो' म्हणून, पण ते माझं खरं उत्तर नाही.''
अक्कांच्या बोलण्यातला हताश सूर नानांना बोचला. म्हणजे ही माझ्या संसारात खूष नाही. कपडेलत्ते, दागदागिने सगळी हौस मी पुरवली. तरी हिला असं का वाटावं या विचाराने नाना अस्वस्थ झाले.
"काय कमी पडलं तुला? सगळी हौस पुरवली मी तुझी. तरीही तू कष्टी का?
"तुम्ही माझी हौस पुरवली नाहीत असं मी मुळीच म्हणणार नाही. साडी म्हटली साडी घेतलीत पण ती तुमच्या आवडत्या रंगाची, दागिने केलेत ते तुमच्या मनात आलं तेव्हा. लौकिकार्थाने आपला संसार सुखाचाच म्हटला पाहिजे. पण तो मला माझा वाटत नाही. स्वयंपाकघरातल्या भांड्यांपासून मुलांच्या नावापर्यंत त्यावर तुमचा, फक्त तुमचाच ठसा आहे हे खुपतंय हो मला. तुमच्या संसारात माझं स्थान नगण्य आहे असं वाटतंय. त्याने उगीचच हुरहूर वाटतेय.'' एका दमात सगळं बोलून अक्का गप्प झाल्या. अक्कांच्या उद्रेकाने नाना स्तंभित झाले. आपल्या सतत हसतमुख गोड बोलणाऱ्या पत्नीच्या मनात असं काही दडपलेलं असेल याची त्यांना सुतराम कल्पना नव्हती.
"अग, काही तरीच काय? तुम्ही बायका काहीतरी तर्कटं लढवता.''
"बघा, रागावलात. यासाठीच हे टाळायला मी एकटी बसले होते. तुम्हाला आठवतही नसेल, पण खूप मागे एकदा घर आवरत असताना मला माझी शाळेतली गाण्याची, वक्तृत्व स्धेतल्या बक्षिसांची सर्टिफिकेट्स धोब्याला द्यायच्या कपड्यांच्या खोक्यात तळाला मिळाली होती. वर तुम्ही चेष्टा केली होती,
"आता कुठे तुला नोकरीला जायचंय म्हणून.'
"अग, तुझा राग कमी करायला म्हटलं असेल.''
"नाही श्री. माझा राग, वैफल्यही तुम्ही लाइटली घेतलंत. माझं म्हणून काही वेगळं अस्तित्व आहे हेच तुमच्या लक्षात आलं नाही.''
नाना स्तब्ध झाले. पण गेल्या पंचवीस वर्षांत हे त्यांना कधी जाणवलंच नाही, किंबहुना अक्कांनी त्यांना कधी हे जाणवूनच दिलं नव्हतं. कायम घरातल्या बारीक सारीक गोष्टी करण्यात, मुलांची काळजी घेण्यात आक्का गुंग असायच्या. मुलं लहान असताना तर कोणत्याच समारंभाला त्या येऊ शकल्या नव्हत्या.
"आणखी आठवतं तुम्हाला? आपल्याकडे भीमसेन जोशींच्या कार्यक्रमाचे दोन पास आले होते. मी आपली खूष तर तुम्ही मित्राला घेऊन कार्यक्रमाला गेलात. मला गाणं आवडतं हेही तुमच्या लक्षात नव्हतं.''
"शारदा, अग आज लग्नाच्या वाढदिवशी काय चालवलं आहेस तू? अग, माझ्या डोक्यातही नव्हतं असं काही. मुलं लहान आहेत, मी कशी येऊ असं तूच म्हणायचीस नेहमी. इतका दुष्ट आहे का ग मी?''
"नाही हो, तोच तर प्रॉब्लेम आहे. तुम्ही फार चांगले आहात. पण ते पुरुषाच्या दृष्टिकोनातून. एका बाईचं मन तुम्हाला कधी जाणवलंच नाही, तिच्या म्हणून काही वेगळ्या भावना असतात, इच्छा असतात हे तुम्ही लक्षातच घेतलं नाही आणि सगळ्यात मोठा वार केलात तो माझ्या ऑपरेशनच्या वेळी. मला वन्संच्या हवाली करून चक्क ऑफिसला गेलात.
"अग, ऑफिसचं काम दुसऱ्यावर सोपवायला नको होतं का?'' नानांचा स्वर त्यांच्या नकळतच पुन्हा तापायला लागला होता.
"हळू. उगाच चिडू नका. समजून घ्या आता बोलतोच आहोत तर. अहो, जगाने लाख दिलं तरी आपल्या नवऱ्याकडून मिळणारं चिमुटभर प्रेमही बाईला लाखमोलाचं असतं. घाबरलेल्या मनाच्या अवस्थेत माझ्याबरोबर वन्स असणं आणि तुम्ही असणं यात फरक नाही का? मी तुमची प्रत्येक अडचण, इच्छा समजून घेत राहिले तशा तुम्हीही माझ्या अडचणी, इच्छा समजून घ्याव्या एवढंच मला वाटतं. मला तुम्ही बोटाला धरून चालवणारे नको आहात श्री. हातात हात गुंफून चालणारे हवे आहात.''
बोलता बोलता अक्कांचा आवाज कापला. चकितसे आणि त्यामुळेच स्तब्ध होऊन नाना गप्प बसून राहिले. रात्रीच्या शांत चांदण्यात फक्त झोपाळ्याच्या कड्यांचा मंद आवाज उमटत राहिला आणि त्यावर झुलत राहिल्या दोन सावल्या; आपापल्या विचारात गढलेल्या. प्रथम भानावर आले ते नानाच.
"शारदा, हे जे तू सांगितलंस ते मला कधी जाणवलंच नाही. मी कायम तुझं मित्रांकडे कौतुक करतो. आदर्श पत्नी, आदर्श माता, आदर्श सून म्हणून. मित्र जेव्हा आपापल्या बायकांबद्दल काही तक्रारी सांगायचे, तुझी स्तुती करायचे तेव्हा माझ्या अंगावर मूठभर मास चढायचं. माझ्यापरतं तुझं वेगळं अस्तित्व मी कधी मानलं नाही. कारण तू ते कधी जाणवू दिलं नाहीस. का केलंस तू असं? मी चुकलोही असेन. त्याबद्दल मी क्षमाही मागतो तुझी. पण तू तरी अशी घुसमटत का राहिलीस? ते पण चुकीचं नाही का? माझ्याकडे एकदा तरी मन मोकळं करायचंस ना! तुम्ही बायका नवऱ्याच्या चेहऱ्याकडे बघून त्याचं मन जाणता. पुरुषांना नसेल ते जमत. पण प्रेम करतात गं ते जीवापाड तुमच्यावर. क्षमा कर मला, प्लीज!'' नानांनी खरंच हात जोडलेले बघून अक्का थरारल्या.
"अहो, अहो, काय करताय तुम्ही हे?'' असं कळवळून म्हणत त्यांनी आवेगाने नानांचे हात पकडले.
"त्या दिवसापासून मी बदललो.'' नाना बोलत होते. ""त्या मंद चंद्रप्रकाशात शारदेकडे बघताना विलक्षण अपराधीपण जाणवलं मला. कोणतीही गोष्ट करताना शारदेचा विचार मनात पहिल्यांदा यायला लागला. गेल्या पंचवीस वर्षांत करायच्या राहून गेलेल्या गोष्टी करायला लागलो. मात्र त्या करण्यापूर्वी शारदेकडून एक वचन मात्र घेतलं. मनाला खटकणाऱ्या गोष्टी बोलून दाखवायचं. नव्याने संसार सुरू झाला आमचा त्या दिवसापासून. म्हणून या 25 च्या आकड्याच्या मेणबत्त्या.''
नानांनी हसत सगळ्यांकडे पाहिलं. डोळ्याच्या कडेला जमलेलं पाणी निपटून टाकताना त्यांना सूक्ष्मतेने जाणवले ते अक्कांचे दबके हुंदके आणि काहीतरी अद्भुत पाहत असल्यासारखे झालेले आप्तगणांचे चेहरे. नातवंडं मात्र बावचळ्यासारखी झाली होती.
अक्का हळूच पुढे आल्या. नानाही उठले. त्या तीन मजली केकवरच्या मेणबत्त्या फुंकताना दोघांचे चेहरे उजळून निघाले होते.
No comments:
Post a Comment